गडचिरोली- जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त काल अनेक ठिकाणी यात्रा भरली. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्याचबरोबर, जिल्ह्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या शिव यात्रेनिमित्त पोलिसांनी बॅनर लावले होते. या बॅनरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. यात्रे दरम्यान 'मी नक्षलवादी' असे मजकूर लिहिलेल्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा, चपराळा, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी आणि वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथील महाशिवरात्री यात्रे निमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली. यात्रेकरूंमध्ये नक्षलवाद्यांबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलिसांनी सदर ठिकाणी बॅनर लावले होते. बॅनरमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा जगासमोर आणावा यासाठी 'मी नक्षलवादी' या आशयाची कविता लिहिलेले बॅनर पोलिसांनी लावले होते. हे बॅनर मोठ्या प्रमाणात यात्रकरूंचे लक्ष वेधून घेत आहे. कवितेत नक्षलवादी स्वतःच्या फायद्यासाठी कशा प्रकारे आदिवासी बांधवांवर अन्याय, अत्याचार करत आहेत याचे वास्तव मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले इसम, अनोळखी मृतदेह यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्यांचे फोटो व माहिती सोबत देवून ठिकठिकाणी बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
हेही वाहा- माजी राज्यपाल अलेक्झांडरांचा दत्तक तालुका आजही विकासाच्या प्रतीक्षेतच..