गडचिरोली - ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये(Naxals killed in encounter in Gadchiroli forest) चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल(Gadchiroli SP Ankit Goel) यांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.
"आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे 4 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-60 दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.