गडचिरोली - प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी जनतेकडून झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. यानंतरही जनतेने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करुन आपला जिल्हा कायम ग्रीन झोनमध्ये राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 12 मे) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आरोग्य विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही. आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावे. आम्ही प्रस्तावास तातडीने मंजूरी देऊन ते प्रश्न मार्गी लावू. व्हेंटीलेटर, लॅब उभारणीसाठी आवश्यक मंजूरी तसेच निधी हा आपल्याला तातडीने देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात 18 हजार 844 मजूर गेल्या आठवड्यात बाहेरुन आलेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातून 4 हजार व बाहेर राज्यातून 14 हजार 835 लोक गडचिरोली जिल्ह्यात आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात फिलिपाईन्स या देशामधून एक स्थानिक व्यक्ती आलेला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून त्याला क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आजपर्यंत 2 हजार 468 लोक बाहेर गेले आहेत. 42 हजार 199 लोकांना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आजपर्यंत यातील 19 हजार 131 लोकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. प्रशासन योग्य ते निर्णय घेत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य विभाग हे जबाबदारीने कार्य करत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जे क्वारंटाईन केलेले लोक आहेत त्यातील काही लोक घरी जाण्यासाठी आग्रह करत असून त्यांनी प्रशासनाला दबाव टाकूण घरी जाण्यासाठी आग्रह करु नये. गडचिरोली जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. आपल्या सहकार्याची अपेक्षा असून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याला कायम कोरोनामुक्त ठेवू अशी शपथ घेऊन सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. पण, याविषयीही तक्रारी प्राप्त होत असून व्यापारी वर्गांनी दुकानामध्ये गर्दी होऊ न देता सामाजिक अंतराचे पालन करावे. सुरक्षित अंतर ठेवून साहित्य खरेदी-विक्री करण्यात यावी, याची दक्षता व्यापारी वर्गाने घ्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठ भूसंपादनाचा प्रश्न तातडीने सोडवा
गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक जमीनीबाबतचा प्रश्न तातडीने सोडवा, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत गोंडवाना विद्यापीठाला दिले. जमीनीचा मोबदला हा रेडीरेकनर व शासनाच्या अधिसूचनेनुसार मोबदला देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. जमीन मालकांना बोलावून, त्यांच्या मागण्या समजून व त्यांना शासनाचे मोबदला देण्याचे प्रचलित नियमानुसार मोबदला देणार असल्याचे सांगण्यात यावे. प्रशासन हे जमीन मालकांना नियमानुसारच भूसंपादनाचा मोबदला देणार आहे. जे जमीन मालक प्रक्रिया सांगूनही भूसंपादनाला नकार देतील त्यांच्या जमीनी विहीत कायद्यानुसार शासन अधिग्रहीत करेल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला निर्देश दिले.
हेही वाचा - पालकमंत्री वडेट्टीवारांचा संस्थात्मक विलगीकरणातील लोकांशी संवाद, सहकार्याचे आवाहन