गडचिरोली - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शहरातील शासकीय इंग्रजी माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत तीन विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तीनही विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सेमाना मार्गावर शासकीय इंग्रजी माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळांना नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, या आश्रम शाळेत शिकणारे विद्यार्थी आले नसल्याने नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले नाहीत.
हेही वाचा- भारत बायोटेकचे एक पाऊल पुढे; कोरोनाची लस नाकावाटेही देता येणार
गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून आदिवासी आश्रम शाळेतील विज्ञान शाखेच्या निवडक 101 विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी गडचिरोलीच्या आश्रम शाळेत बोलविण्यात आले. या मार्गदर्शनासाठी 93 विद्यार्थी दाखल झाले.
हेही वाचा-राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव, ८ जणांना लागण
सर्व विद्यार्थ्यांची दोन दिवस आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये बारावीचे दोन तर अकरावीचा एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आला आहे. तीनही विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मोठी खबरदारी बाळगली जात असल्याची माहिती गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
देशात कोरोनाच्या नव्या विषाणुचे आढळले रुग्ण-
कोरोनाचा उद्रेक कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये नवीन कोरोनाचा प्रकार आढळून आला. त्यासाठी इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. त्यात 30 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.