गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी शक्ती प्रदर्शन करून आपले नामांकन दाखल केले. ही उमेदवारी दाखल करण्यासाठी गटागटात विखुरलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे एकतेचे दर्शन घडल्याची चर्चा सुरू झाली आहे. हीच एकजूट शेवटपर्यंत कायम राहिल्यास काँग्रेसला तारणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२००९ ला लोकसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाल्यानंतर गडचिरोली-चिमूर असा नवीन मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातून २००९ला काँग्रेसचे मारोतराव कोवासे तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते निवडून आले. यावेळेसही भाजपने अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी रिंगणात आहेत. अशोक नेते व डॉ. नामदेव उसेंडी हे दोघेही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही समोरासमोर रिंगणात उभे होते. त्यावेळेस नेते यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळेस मोदी लाट होती. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे यावेळेस अशोक नेते यांना डॉ. उसेंडी काट्याची टक्कर देणार यात शंका नाही, असे जाणकार सांगतात. मात्र, काँग्रेसमधील गटबाजी पराभवाला जबाबदार ठरू शकते, अशी भीतीही वर्तविली जात होती.
२२ मार्च रोजी डॉ. नामदेव उसेंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा गटागटात विखुरलेले सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विजय वडेट्टीवार यांनी 'आम्ही सगळे एक' असल्याचे सांगून गटबाजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 'आमचा विजय पक्का असून आम्ही भाजप सरकारला घरचा रस्ता दाखवू' असेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील गटबाजी दूर झाल्याने व एकतेचे दर्शन घडल्याने विरोधी पक्षातही चांगलीच धडकी भरली आहे. भाजपमध्येही काही प्रमाणात अशीच गटबाजी असून जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मुनगंटीवार हे शुक्रवारी गडचिरोली येथे आले असता, माध्यमांनी त्यांना विचारणा केली. यावर त्यांनी पक्षामध्ये कोणतीही गटबाजी नसून 'आम्ही अशोक नेते यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावणार आहोत, विजय आमचाच आहे' असा दावा केला.
दोन्ही प्रमुख पक्षांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशकुमार गजबे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेसुद्धा दोन्ही उमेदवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतात. 'आमचे कार्यकर्ते मतदारांशी डोअर टू डोअर भेटी घेऊन प्रचार करणार असल्याने आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास उमेदवार रमेशकुमार गजगे यांनी व्यक्त केला आहे. प्रचाराची रंगात आता वाढणार असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडणार आहेत, हे निश्चित आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत २३ अर्जाची विक्री झाली असून यात चार जणांनी सात अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे रमेशकुमार गजबे यांच्यासह भाजपचे अशोक नेते यांचा समावेश आहे. २५ मार्च नामनिर्देशन भरण्याचा अखेरचा दिवस असून या दिवशी पुन्हा भाजपचे उमेदवार अशोक नेते शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे.