गडचिरोली - येथे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान, नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात येणार आहे. या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव उधळून लावण्यात रविवारी गडचिरोली पोलिसांना यश आले. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांनी कुरखेडा तालुक्यातील लवारी जंगल परिसरातून जमीनीत पुरून ठेवलेले स्फोटके आणि इतर साहित्य जप्त केल्याने, मोठा अनर्थ टळला.
जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान
नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. असे, साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत पुरुन ठेवतात. तसेच, काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल, अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा जमिनीत पुरुन ठेवतात. रविवारी सी-60 जवान कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस ठाण्याच्या लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना, जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा आढळून आला.
कुकर बॉम्ब
नक्षलवाद्यांनी एका डंपमध्ये कुकर बॉम्ब १ नग, नक्षल पॅन्ट १ नग, नक्षल शर्ट १ नग, पिटु १ नग, शाल १ नग, प्लॅस्टिक शिट १ नग, बॅन्डेज पट्टी १ नग, चिमटा १ नग, व्हॅसलीन डब्बी १ नग, बॅटरी (व्हेलॉसिटी) १ नग, स्प्रिंग १ नग, ३०३ खाली केस १ नग, एसएलआर खाली केस १ नग, पेंचीस १ नग व पुस्तके ३ नग व इतर साहित्य लपवून ठेवले होते. सर्व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. सी-60 जवानांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे. तसेच, जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.