गडचिरोली - छत्तीसगड राज्याच्या सिमेलगत भामरागड तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर उदध्वस्त करण्यात गडचिरोली पोलीस दलाला रविवारी यश आले. अबुजमाड जंगलातील कोपरशीची व फुलनार गाव जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा कॅम्प सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केला.
नक्षलवाद्यांकडून मोठ्या घातपाताची योजना आखली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान अबुजमाड जंगल परिसरात पाठवण्यात आले. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवळपास अडीच तास पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक चालली. मात्र, पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. जवानांनी नक्षलवाद्यांचा पाठलाग केला तेव्हा पुन्हा चकमक उडाली. याहीवेळी नक्षलवाद्यांनी पळ काढला. तेव्हा पुन्हा पाठलाग केला असता, तिसऱ्यांदा चकमक उडाली, मात्र पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. घटनास्थळावर सर्च केले असता घातपाताच्या दृष्टीने मोठा कॅम्प लावल्याचे निदर्शनास आले. हा कॅम्प पोलिसांनी उदध्वस्त केला.
घटनास्थळावरून आयडी बॉम्ब मोठ्या प्रमाणावर व नक्षल साहित्य आढळून आले. आयडी बॉम्ब सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून जवानांनी नक्षलविरोधात महत्वपूर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांची घालपाताची मोठी योजना उधळून लावण्यात यश मिळवले आहे.
हेही वाचा - गडचिरोली : नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळला