गडचिरोली - गडचिरोली पोलीस दलातील सी-६० व विशेष कृती दलांचे जवान 27 मे 2019 रोजी सकाळच्या सुमारास दराची जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. मात्र, पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. तेव्हाच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले असून तब्बल सव्वा महिन्यांनी त्याच्या मृतदेहाचे अवशेष गडचिरोली पोलिसांनी जप्त केले आहेत.
उपविभाग धानोराअंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कटेझरी हद्दीतील दराची जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे सी-६० व विशेष कृती दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. तेव्हा पोलिसांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. घटनेनंतर परिसराची पाहणी केली असता एक १२ बोअर रायफल, सात यु.बी.जी.एल, तीन वॉकी टॉकी, एक सॅमसंग कंपनीचा टॅब, एक मोबाईल चार्जर, नक्षली पुस्तके असे मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य सापडले. घटनास्थळी बरेच नक्षलवादी चकमकीत गंभीर जखमी झाल्याचा संशय होता. मात्र, तेव्हा कुणीही जखमी किंवा मृत आढळून आले नव्हते.
या चकमकीत मृत झालेला नक्षलवादी शामराव उर्फ मुकेश पांडू गोटा (रा. पिपलीबुर्गी ता. एटापल्ली) याचा मृतदेह त्याच्या नक्षल साथीदारांनी दराची जंगल परिसरात जाळल्याबाबत पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली. यावरून पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जळालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.
त्या ठिकाणावरील मृतदेहाचे अवशेष नायब तहसीलदार धानोरा यांच्या समक्ष पुढील कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आले आहेत. तसेच या मृत नक्षलवाद्याच्या आई-वडिलांनी शामरावच्या मृतदेहाची राख त्यांना नक्षलवाद्यांनी घरी आणून दिल्याचे सांगितले असून त्यांनी आपल्या मुलाचे तेरावे केल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दराची जंगल परिसरातील चकमकीत नक्षलवादी शामराव गोटा हा ठार झाल्याच्या घटनेला पुष्टी मिळाली आहे.