गडचिरोली - दक्षिण गडचिरोली भागातील अतिसंवेदनशील असलेल्या तीन पोलीस ठाण्यांवर रात्रीच्या सुमारास ड्रोनद्वारे रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. ड्रोन उडत असताना पोलीस जवान सतर्क झाले आणि ड्रोनवर काही राऊंड फायरही केले. मात्र ड्रोन अधिक उंचीवर असल्याने तो ड्रोन परत जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती आहे.
दुर्गम भागातील अहेरी तालुक्यातील जिम्मलगट्टा, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, रेपनपल्ली या तीन पोलीस पोस्टवर ड्रोनने रेकी केली जात होती. दरम्यान रात्री पोलीस ठाण्याच्या परिसरात उंचीवर ड्रोन उडत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस जवानांना दिसले. पोलीस जवान सतर्क झाले आणि रायफलने काही राउंड फायर केले. मात्र ड्रोन उंचीवर असल्याने निशाना साधता आला नाही. त्यामुळे ड्रोन परत जाण्यास यशस्वी ठरला. मात्र हे ड्रोन नक्षलवाद्यांनी की अजून कुणी उडवलं, हे मात्र अजून समोर आलेलं नाही.
मागील महिन्यातही एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यावर अशाचप्रकारे ड्रोनने रेकी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराबाबत गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दुजोरा दिला असला तरी नक्षलवादी ड्रोन उडवून पोलीस ठाण्याची रेकी करत आहेत, याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. नक्षलवाद्यांचे ड्रोन असतील तर त्यांच्याकडे ड्रोन कॅमेरे आले कुठून हा मोठा प्रश्न असून सुरक्षा यंत्रणेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - केंद्रीय सुरक्षा सल्लागार, सीआरपीएफच्या महासंचालकांनी घेतला गडचिरोलीतील नक्षलस्थितीचा आढावा
हेही वाचा - बजरंगदलाच्या मदतीने ६५ गोवंशांना पोलिसांकडून जीवनदान; तीन ट्रक ताब्यात