गडचिरोली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीन विधानसभा क्षेत्रात 7 लाख 74 हजार 948 मतदार तर 930 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे प्रवीण पोटेंना यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आदेश
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये आरमोरी विधानसभा मतदारसंघात 294, गडचिरोली 343 व अहेरी विधानसभा मतदारसंघात 290 असे 930 मतदान केंद्र राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवमतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये 7 लाख 74 हजार 948 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 92 हजार 988 पुरुष मतदार, तर 3 लाख 87 हजार 558 स्त्री मतदार आहेत.
हेही वाचा - सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू - प्रकाश आंबेडकर
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2 हजार 30 नव्या मतदारांची भर पडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडणूक संदर्भात कोणतीही अडचण असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल. निवडणुकीसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे तर विविध प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे, जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होत्या.