गडचिरोली Gadchiroli Crime News : मागील काही दिवसापांसून गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील 5 जणांच्या अचानक झालेल्या मृत्यूनं राज्यभरात खळबळ उडाली होती. गडचिरोलीतील शंकर पिरु कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा अवघ्या 20 दिवसाच्या कालावधीत अचानक आजारी पडून संशयितरित्या मृत्यू झाला होता. या घटनेमुळं परिसरात भीती आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर गडचिरोली पोलिसांना या मृत्यूसत्राचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. सुनेनंच मामीच्या मदतीनं संपूर्ण कुटुंब संपवल्याचं समोर आलंय.
नेमकी घटना काय : महागाव येथील शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया यांची 20 सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. यानंतर दोघांना नागपूर इथं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे व नंतर 27 सप्टेंबरला त्यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला. यानंतर अहेरी इथं राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन कुंभारे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांचीही प्रकृती बिघडली. या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, अनेक औषध उपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावली. शेवटी 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा ऊर्फ वर्षा उराडे आणि 15 ऑक्टोबरला रोशन कुंभारे याचाही मृत्यू झाला.
तिघांची प्रकृती स्थिर : आई-वडील उपचारासाठी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे दिल्लीहून चंद्रपूरला आला. मात्र, आई वडिलांच्या मृत्युनंतर तो परत गेल्यावर त्याचीही प्रकृती बिघडली. त्याला दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं. शंकर कुंभारे आणि विजया कुंभारे यांना अहेरीहून चंद्रपूरला उपचारासाठी नेणारा कारचा चालक राकेश मडावी यांचीही दुसऱ्या दिवशी प्रकृती बिघडली. त्यालाही चंद्रपूरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच नातलग भरती असल्यानं त्यांना मदतीच्या उद्देशानं शंकर कुंभारेंचा मेहुणीचा मुलगा चंद्रपूर आणि नागपूर इथं आल्यानं त्याचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आलं असून सध्या या तिघांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर : पोलीसांना शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती गावातील सुत्रांकडून मिळाली. यानंतर पोलीसांनी त्या दोघींच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर तपासात ही धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी संघमित्रा कुंभारे हिनं रोशन कुंभारे याच्यासोबत तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. या कारणामुळं तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर पती रोशन आणि सासरची मंडळी तिच्या माहेरच्या लोकांना वारंवार टोमणे मारायचे. तसंच दुसरी संशयित आरोपी रोझा रामटेके हिनं तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करीत असल्याच्या कारणावरून योजना आखली. त्यानंतर त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब आणि त्यांच्या नातलागांना विष देऊन ठार मारण्याची योजना आखल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलीय.
पाच जणांचा मृत्यू : रोझा रामटेके हिनं तेलंगणात जाऊन विष आणलं. ते विष संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिलं. या विषाचा हळूहळू परिणाम होऊन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरुवात झाली. या घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा :
- Honor Killing in Mumbai : मुंबईत ऑनर किलिंग; आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं वडील, भावानं तरुणीसह युपीच्या प्रेमवीराला संपवलं!
- Dandia Fake Pass Case: 'फर्जी' वेब सिरीज पाहून बनवले दांडियाचे बनावट पास, चौघांना अटक
- Man Killed Wife Daughter : थरारक! पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या, पती कॅमेऱ्यासमोर म्हणाला...