गडचिरोली - पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'पोलीस दादालोरा खिडकी'अंतर्गत धोंडराज येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'महाडीबीटी पोर्टल'वर भात, मूग, उडीद असे बियाणे अनुदान मिळण्यासाठी धोंडराज हद्दीतील शेतकऱ्यांना आता मोफत नोंदणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून बियाण्यांवर होणाऱ्या खर्चावर अनुदान मिळणार असून, लाॅकडाऊनच्या काळात आदिवासी शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
नागरिकांनी केले समाधान व्यक्त
ही नोंदणी पोलीस मदत केंद्र धोंडराजकडून मोफत करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश भागात नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नसल्याने, शेतकर्यांना नोंदणीसाठी मोठे अंतर पार करत जावे लागते. तसेच, नेटवर्क नसल्यास पूर्ण दिवस ई-सेवा केंद्रावर थांबावे लागते. नोंदणीसाठीही 100 ते 150 रूपये खर्च होत होता. परंतु, आता पोलीस मदत केंद्र धोंडराजकडून नोंदणी मोफत केल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कल्वानिया, सोमय मुंडे, समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. तसेच, हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रभारी अधिकारी राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक पाटील, प्रीती खोब्रागडे यांनी मेहनत घेतली आहे.
हेही वाचा - ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; वडेट्टीवारांचा पुनरुच्चार