गडचिरोली - गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे हैदराबाद,नागपूर, आष्टी व चंद्रपूर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गसह 17 प्रमुख रस्ते बंद आहेत. या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून, पुरामुळे शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, पर्लकोटा, कठाणी, गाढवी, गोदावरी या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून, अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्गम भागातील नाल्यांनाही पूर असल्याने अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर
सद्यस्थितीत कोरची-बोटेकसा, कोरची-मालेवाडा, कुरखेडा-वैरागड, मनापूर-पिसेवडधा, वडसा-कोकडी, कारवाफ-पेंडरी, गडचिरोली-अर्मोरी, चामोर्शी-तळोधी, चामोर्शी-मार्कंडा, मुलचेरा-घोट, आष्टी-चंद्रपूर, आष्टी-चामोर्शी, अहेरी-देवलमरी अल्लापल्ली-भामरागड हे मार्ग बंद आहेत.