गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, २४ तासात दुसऱ्यांदा पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग आज सायंकाळी ५ वाजता पासून बंद झाला आहे. त्यामुळे, तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.
रविवारी (१६ ऑगस्ट) पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली होती. त्यानंतर काल (१८ ऑगस्ट) सकाळी पाणी ओसरल्यावर मार्ग सुरू झाला. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने भामरागड लगतची पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले असून भामरागड गावातही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पोलीस व महसूल प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्ग बंद असल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा- गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला