गडचिरोली - शुक्रवारी जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळून आले. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रूग्ण कुरखेडा व अहेरी तालुक्यातील असून, ते मुंबई येथून आले होते. तत्पूर्वी काल गुरुवारी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले.
आतापर्यंत कुरखेडा, चामोर्शी, आरमोरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, गडचिरोली, अहेरी, कोरची तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आढळलेले सर्व रुग्ण जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. सध्या तरी जिल्ह्यातच असलेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, ही जमेची बाजू आहे. ज्या संस्थात्मक विलगीकरणात रुग्ण आढळून आले ती व त्यांची रहिवासी ठिकाणे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.