गडचिरोली - जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे, तर कुठे शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विहीर, बोरवेल असलेल्या सधन शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे काहीही सोय नाही त्यांच्याकडे पावसाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. तसेच याठिकाणी अद्यापही आधुनिक यंत्रे पोहोचलेलीच नाहीत. त्यामुळे आताही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने शेती करतात.
जिल्ह्यातील अहेरी उपविभागात एटापल्ली आणि भामरागड अशा दोन तालुक्यात तांदळाचे पीक घेतले जाते. मात्र, याठिकाणी एकही सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांकडे विहिर, बोरवेल आहे, त्यांनी भातलावणीला सुरुवात केली आहे. पावसाच्या भरवशावर असलेले शेतकरी अद्यापही प्रतीक्षाच करत आहेत. पाऊस आल्यावरही ते कमी पावसातही पीक येईल असे हलके तांदुळ लावतात. तसेच याठिकाणी अद्यापही आधुनिक यंत्रे पोहोचलेलीच नाहीत. क्वचित एखादा ट्रॅक्टरने शेती करताना दिसतो. त्यामुळे आताही शेतकरी पारंपरीक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने शेती करतात. त्यातही पाऊस नसल्याने भातलावणी परवडणारी नाही. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी, अशी दरवर्षीची स्थिती असते. मात्र, सिंचनाची सोयच नसल्याने त्यांच्याकडे पर्याय नाही.