गडचिरोली - बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 23 मे'ला गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयामध्ये 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान पार पडले होते. राज्यात सर्वाधिक 71 टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात झाले होते. या मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात होते. या पाचही उमेदवारांची आता धाकधूक वाढली आहे. सर्वप्रथम 25 फेर्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून त्यानंतर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच मतदान केंद्रावरच्या 5 व्हीव्हीपॅट मतांच्या मुद्रित पावत्यांची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यामधील मतांचा आकडा आल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकालाला सायंकाळ होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी याप्रमाणे साडेचारशे कर्मचारी काम पाहणार आहेत. तर इतर अधिकारी व कर्मचारी असे सहाशे ते सातशे जण मतमोजणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
सुरुवातीला पोस्टल मते आणि सैन्यदलाने वापरलेल्या ईटीपीबीएस सिस्टममधील मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष 8.30 वाजता ईव्हीएममधील मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी कृषी महाविद्यालयाच्या दोन मजल्यांवर होणार असून एका हॉलमध्ये 14 टेबल याप्रमाणे वेगवेगळे हॉलमधे एकाच वेळी मतमोजणी होईल. मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्या होणार असल्याने एका फेरीसाठी अंदाजे 20 ते 30 मिनिट वेळ लागणार आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी मतमोजणी परिसरात दूरवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
मोबाईल व कॅमेरे नेण्यास बंदी
मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप यासारख्या कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी राहणार आहे. केवळ तळ मजल्यावर राहणाऱ्या मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांना मोबाईल वापरण्याची परवानगी मिळू शकते. मात्र याबाबतही स्पष्ट सूचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.