गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रविवारी संध्याकाळी ६.४८ वाजता जिल्ह्यातील सिरोंचा परिसरालगत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. हवामान खात्याच्या सेस्मॉलॉजी विभागाने या भूकंपाला दुजोरा दिला आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी भूकंपाचे केंद्र असून 77 किमी खोलीसह सायंकाळी 6.48 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गडचिरोली आणि तेलंगाणा सीमेवरील जाफराबाद चाक (प्राणहिता नदी) तालुका सिरोंचा तसेच अहेरी, आष्टी या भागात सुद्धा हलके-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे झटके जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.अहेरी तालुक्यातील अहेरी आलापल्ली राजाराम जिम्मलगट्टा गोमणी व सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद पॅच बामनी सिरोंचा सिरोंचा माल या भागात भूकंपाचे धक्के जास्त जाणवले.
भूकंपाचा केंद्रबिंदू हा नागपूरपासून २५५ किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. या भूकंपामुळे कोणत्याच्या प्रकारच्या जीवित व वित्तहानीचे वृत्त नाही. लोकांनी भयभीत होऊ नये व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही विदर्भापासून १०० किलोमीटरच्या अंतरावरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात चार भूकंपांची नोंद करण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर रोजीच छिंदवाडा येथे ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती. मुळात विदर्भ आणि विशेषत: गडचिरोली हे भूकंपप्रवण क्षेत्र नाही. मात्र गेल्या काही काळापासून येथेही भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
मागील आठवड्यात 24 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाची तीव्रता 4.46 रिश्टर स्केलवर नोंद झाली. तर साताऱ्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती.