गडचिरोली - जगात सध्या कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं आहे. राज्यातही प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आली आहे. परिणामी बाजारपेठ बंद असल्याने शेकडो क्विंटल रताळी विक्री अभावी मातीमोल होण्याची वेळ आली असून गडचिरोलीतील रताळी उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत.
रताळे उत्पादन करणारा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव गाव म्हणून मुलचेरा तालुक्यातील लभानतांडा गावाची ओळख आहे. गावातील संपूर्ण शेतकरी रताळींचे उत्पादन घेतात. मात्र, येथे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी गावोगावी फिरून रताळी विक्री करतात. सध्या रताळी काढणी सुरू असून २ ते ३ दिवसात काढलेली रताळी विक्री करावी लागतात. मात्र, बाजारपेठ अभावी विक्री होत नसल्याने शेकडो क्विंटल रताळी खराब होण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. जीवनावश्यक वस्तूचे सोडून इतर सर्व दुकानं बंद आहेत. बससेवा ठप्प असून खाजगी वाहनांनासुद्धा परवानगी नसल्याने रताळी उत्पादकांना याचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.