गडचिरोली : राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना केली. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 7 ऑक्टोबरला शासन निर्णय निर्गमित केला आहे. या समितीमध्ये गडचिरोलीच्या हेमलकसा येथील सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची निवड केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीची निवड करण्यासाठी ही समिती पुढील तीन वर्ष कामकाज करणार आहे. नव्या निर्णयानुसार या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, तर उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री हे काम पाहणार आहेत. समितीचे सदस्य सचिव म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, तर शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे काम पाहणार आहेत. त्याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून शास्त्रज्ञ विभागातून डॉ. अनिल काकोडकर, सामाजिक कार्य विभागातून सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, उद्योग विभागातून बाबा कल्याणी, क्रीडा विभागातून संदीप पाटील, तर कला विभागातून दिलीप प्रभावळकर यांची निवड करण्यात आली आहे.