गडचिरोली - ‘अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजीन’च्या ६८ व्या वार्षिक संमेलनात बीजभाषणासाठी पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना निमंत्रित करण्यात आले आहे. वॉशिंग्टन जवळच्या गेलॉर्ड नॅशनल रिसॉर्ट अँड कन्वेंशन सेंटर, नॅशनल हार्बर, मेरीलँड येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या प्रारंभिक सत्रात दोघेही उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
हेही वाचा - गडचिरोलीत मतदानाला सुरुवात; समाजसेवक बंग दांम्पत्याने केले मतदान
उष्णकटिबंधीय प्रदेशातील संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सेवा आणि सुविधांवर व्यापक चर्चा या संमेलनात होणार आहे. डॉ. अभय बंग आपल्या बीजभाषणात ‘लोकांसाठी व लोकांसोबत आरोग्य संशोधन’ या विषयावर बोलणार आहेत. तर डॉ. राणी बंग ‘स्त्रियांना ऐकणे व समजून घेणे’ या विषयावर बोलणार आहेत. या भेटीत डॉ. अभय बंग हे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, सेव्ह द चिल्ड्रेन आणि अॅटलांटाचे एमरी विद्यापीठ येथेही आरोग्याचे नवीन संशोधन आणि प्रयोगावर भाषणे देणार आहेत.
१९०३ मध्ये स्थापन झालेली अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन ही उष्णकटिबंधीय संसर्गजन्य रोगांचे जगभरातील ओझे कमी करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य सुधारणांसाठी समर्पित असलेली तज्ज्ञांची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे. वैज्ञानिक पुरावे तयार करून आणि त्याचे एकत्रीकरण करून आरोग्य धोरणे ठरविण्यास सहकार्य करण्याचे काम ही संस्था करीत आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील तसेच जागतिक आरोग्य संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन ही संस्था सातत्याने करीत आहे.
हेही वाचा - सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा; वक्तव्यामुळे संभ्रम
डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचे शिक्षण अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे १९८३ साली झाले. त्यानंतरच्या ३५ वर्षात त्यांनी ग्रामीण आणि आदिवासींच्या आरोग्यावर केलेले काम आणि संशोधने जगभर गाजली आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने या दोघांना आल्युम्नाय अवॉर्ड तसेच सोसायटी फॉर स्कॉलर्स या सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित केले आहे. सेव्ह द चिल्ड्रेन्सचा तसेच कोअर संघटनेचा डोरी स्टार्म्स अवॉर्ड डॉ. अभय बंग यांना मिळाला आहे. ते दोघेही मॅक ऑर्थर फाउंडेशन पुरस्कार विजेते असून २००५ साली त्यांना ‘टाईम’ नियतकालिकाने ग्लोबल हेल्थ हीरो म्हणून सन्मानित केले आहे.