गडचिरोली - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. उद्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या सहा तालुक्यातील 499 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 2622 कर्मचारी व अधिकारी -
उद्या उत्तर गडचिरोलीतील सहा तालुक्यातील 170 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 31 हजार 489 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 जाख 14 हजार 235 महिला तर 1 लाख 17 हजार 254 पुरूषांचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी 499 प्रभागामधून 1124 जागांसाठी 2578 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2622 कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत.
13 ग्रामपंचायती बिनविरोध -
पहिल्या टप्प्यात उत्तर गडचिरोलीतील गडचिरोली, कोरची, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा या 6 तालुक्यातील 198 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रत्यक्ष 170 ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकही अर्ज सादर न केलेल्या ग्रामपंचायतीत धानोरा तालुक्यातील 2 ग्रामपंचायत आहे त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. पोलिंग पार्टीला नेण्यासाठी पोलिसांच्या मदतीला दोन हेलिकॉप्टर मिळाले आहे. या हेलिकॉप्टरच्या मदतीने पोलिंग पार्ट्यांना मतदान केंद्राच्या बेसकॅम्पपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
हेही वाचा - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून; एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प