गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील रेगडीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या घोट मार्गावरील माडेआमगावजवळ एका पुलाखाली नक्षल्यांनी घातपाताच्यादृष्टीने 8 ते 10 किलोचा शक्तीशाली बॉम्ब लावला होता. ही बाब बुधवारी समोर येताच पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून बॉम्ब नष्ट केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
१ मे रोजी अशाचप्रकारे कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळील पुलाखाली स्फोटके लावून घातपात घडवून आणला होता. या घटनेत १५ जवानांना वीरमरण आले होते. असाच घातपात घडवण्यासाठी माडेआमगाव - घोट या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील पुलावर शक्तिशाली बॉम्ब लावला होता. मात्र, यासंदर्भातली माहिती मिळताच पोलिसांनी सतर्कता बाळगत बॉम्ब निकामी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या परिसरात आजपर्यंत नक्षल्यांनी अशा मोठ्या घटना घडवल्या नाहीत. मात्र, आता नक्षल्यांनी घातपाताचा कट रचल्यामुळे पोलीस विभाग या भागात शोधमोहिम तीव्र करत आहे.
जांभुळखेडाच्या घटनेच्या तपासादरम्यान नक्षली चळवळीशी सबंधित अनेक मासे गळाला लागले आहेत. यामुळे धास्तावलेले नक्षली आणखी घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास येत आहे. 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल्यांचा सप्ताह असल्याने या पार्श्वभूमीवर घातपाताच्या मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आपल्या 15 जवानांना वीरमरण आले होते.