गडचिरोली - जिल्ह्यात 2010-2011 पासून सौरऊर्जेवर चालणारी दुहेरीनळ योजना विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुरू झाली. ही योजना कमी खर्चीक असल्याने त्याची प्रत्येक गावात मागणी वाढली आहे. ही योजना भामरागड नगर पंचायतीने आपला नगरपंचायती अंतर्गत मेडपल्ली व हेमलखसा गावात दुहेरी नळ योजना कार्यन्वित करण्यात आली असून शुक्रवारी (दि.22 नोव्हें.) तहसीलदार तथा नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी कैलास अंडिल यांच्या प्रमुख उपस्थितीत नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
तालुक्यातील या पूर्वीचे या योजना काही ग्रामपंचायतींनी कागदावरच पूर्ण करून बिले उचलून पचवले. तर काही ग्रामपंचायतींनी थातूर-मातुर करुन दाखवून या योजनेचा तीनतेरा केली. वीज समस्या असल्याने वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारी नळ योजनाद्वारे पाणी पुरविण्यासाठी पाणी टाकी उभारण्यात आली.
ग्रामपंचायतीला उत्पन्नाची साधने कमी आहेत. यामुळे पाणीपुरवठ्यासाठी जास्त खर्च करू शकत नाहीत. पण, या योजनेमुळे कमी खर्चात पाणी टंचाईची समस्येला तोंड देता येणार आहे. या योजनेचाच लाभ घेत भामरागड नगरपंचायतीने मेडपल्ली व हेमलकसा या गावात दुहेरी नळयोजना कार्यान्वित करण्यात आले. वीज असो अथवा नसो गावातील महिलांना दिवसभर पाणी उपलब्ध होत असते, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी कैलास अंडिल यांनी दिली.
हेही वाचा - आमदार धर्मरावबाबा आत्राम शरद पवारांसोबतच
यापूर्वी हेमलकसा येथे नळ योजनेसाठी पामुलगौतम नदीपासून गावापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी आणण्यात आले होते, मात्र, त्यावेळचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी ते कागदावरच पूर्ण केल्याने पाण्याची सोय झाली नव्हती.परंतु नगरपंचायतीचे प्रशासनाने गावात सौरऊर्जेवर आधारित पाणी योजना सुरू करुन, पाण्याची सोय केल्याबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केले. यावेळी गावकऱ्यांनी तहसीलदार कैलास अंडील व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त केले .