गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या 'माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्बांधणी व बळकटीकरण' या लेखाशीर्षाखाली असलेल्या गडचिरोली युनियन बँकेच्या खात्यातून बनावट धनादेशाच्या आधारे तब्बल कोटी ८६ लाख रुपये लंपास करण्यात आले. त्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी नागपुरातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. देवेंद्र वैद्य असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वैद्यच्या अटकेमुळे आरोपींची संख्या १३वर पोहचली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत माजी मालगुजारी तलाव 'पुनर्बाधणी व बळकटी आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये इतकी रक्कम आरोपींनी काढून नेली. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळती केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील वरिष्ठ सहायक बलराज जुमनाके याच्यासह १२ आरोपींना अटक केली आहे. हे सर्व जण सध्या कारागृहात आहेत. पोलिसांनी नागपुरातील पारडी भागातून देवेंद्र वैद्य यास अटक केली. यामुळे आरोपींची संख्या १३वर पोहोचली आहे. देवेंद्रला न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील अपहाराचा मुख्य सूत्रधार असलेला नागपूरचा स्नेहदीप सोनी याचा देवेंद्र वैद्य हा हस्तक आहे. कागदपत्रे गोळा करुन देण्यापासून, तर महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क करण्यापर्यंत सर्व कामे हाच करीत होता. देवेंद्रची पत्नी नागपुरात नगरसेविका असून, त्याचा राजकीय क्षेत्रातही चांगला जम आहे. तो बिल्डर असून, नागपुरातील अनेक भागात त्याचे लेआऊट आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी दिली.