गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवादी दहशत पसरविण्याच्या दृष्टीने निरपराध लोकांची हत्या करतात, संविधानाला विरोध दर्शवून दुर्गम भागातील शिक्षकांना धमकावून काळा कपडा लावण्याचे कृत्य करत असतात. मात्र, याच परिसरात रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही बद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्धेशाने जन संघर्ष समितीच्या वतीने ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती.
सकाळी आलापल्ली वरुन महाराष्ट्र राज्याची सीमा भामरगड ते लाहेरीपर्यंत ही यात्रा निघाली होती. भामरगड येथे पोहोचताच नागरिकांनी यात्रेचे भव्य स्वागत केले. यावेळी जन संघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के त्यांच्यासह सदस्य सोबत होते. यावेळी संविधान पुस्तिका आणि तिरंगा पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक राष्ट्रगीत झाले. यानंतर संविधानाचे अधिकार आणि कर्तव्य याचे सामूहिक वाचन करण्यात आले.
हेही वाचा - राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती - गृहमंत्री
आपल्या पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाले आहे. देशाच्या या सर्वोत्तम उत्सवात आज भामरागड, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही स्वातंत्र्य कोसो दुर असल्याचे चित्र आहे. नक्षलवादी चळवळीत देशाचे अतोनात नुकसान होत असताना आपण एक व्यक्ती म्हणून काहीही करु शकत नाही का? की फक्त शासकीय यंत्रणा, पोलिसांचे ते काम आहे? असे बोलून गप्प बसता येणार नाही. आपण आपल्या देशाच्या सीमेवर आणि देशाअंतर्गत आपल्या जवानांसोबत कायम उभे आहोत याची जाणीव वेळोवेळी करुन देणे ही एक व्यक्ती म्हणून आपली जवाबदारी आहे. याच हेतूने भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात जाऊन आपल्या सैनिक आणि तेथील स्थानिक रहिवाशांसोबत प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिवसदरम्यान तिरंगा यात्रेचे आयोजन जन संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी करण्यात येते.
यावर्षीही 26 जानेवारी 2020 ला आलपल्ली ते लाहेरी संविधान तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आले. आपण देखील या यात्रेचा एक भाग होऊन हा प्रजासत्ताक दिन देशाच्या नागरिक आदिवासी बंधू आणि सैनिकासोबत साजरा करुया, या उद्धेशाने आल्लापल्ली या मार्गाने निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया दत्ता शिर्के यांनी यावेळी दिली.