गडचिरोली - अतिसंवेदनशील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी व आमगाव या ४ विधानसभा क्षेत्रातील मतदान ३ वाजता आटोपले आहे. आता पोलिंग पार्ट्या सुरक्षित आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघातील चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र वगळता आरमोरी, गडचिरोली, आमगाव, अहेरी हे ४ विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले होते. त्यामुळेच या ४ विधानसभा क्षेत्रांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान आटोपले. दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. ज्या मतदान केंद्रावर ३ वाजण्याच्या अगोदर मतदारांनी गर्दी केली, अशा मतदान केंद्रावर दुपारी ३ नंतरही मतदान सुरू आहे. तर ज्या मतदान केंद्रावर तीनपर्यंत संपूर्ण मतदान झाले, त्या मतदान केंद्रावरून पोलिंग पार्ट्या लवकरच तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयात परतीसाठी निघणार आहेत.
आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या वाघेझरी मतदान केंद्राजवळ नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पोलिंग पार्ट्या परतताना मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याने अतिशय दक्षतेने पोलिंग पार्ट्या सुरक्षित रित्या आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दुर्गम भागात हेलिकॉप्टरद्वारे पोलिंग पार्ट्या पोहोचवण्यात आल्या. त्यांना हेलिकॉप्टरद्वारेच परत आणले जाणार आहे. तर काही भागात सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतर जंगलातून पायी जाऊन पोलीस पार्टी मतदान केंद्रावर पोहोचल्या. पोलिंग पार्ट्या परतीचा प्रवाससुद्धा गोपनीयरीत्या जंगलातूनच पायी परतणार आहेत.
दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी हाती आली नसली तरी दुपारी एक वाजेपर्यंत ४३.४३ टक्के मतदान झाले. चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार असल्याने मतदानाची टक्केवारी ७० पर्यंत जाऊ शकतो, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला आहे.