गडचिरोली : गडचिरोलीतील आपल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्या तिघांची एकत्रित शक्ती भविष्यातील राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
तिघांची प्रथमच जाहीर कार्यक्रमात हजेरी : गडचिरोलीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गडचिरोलीच्या ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अजित पवारांच्या सत्तेतील प्रवेशानंतर या तिघांनी प्रथमच एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री काय म्हणाले? : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. जेव्हा कष्ट करणाऱ्या आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय होतो, तेव्हा अजित पवारांसारखा प्रसंग घडतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवार यांना तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेल्यांचे काय करायचे हे कळते. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले, अशी त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. अजित पवार यांच्या नावातच जीत आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
फडणवीसांनी दिली त्रिशुळाची उपमा : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या एकत्र येण्याला शंकराच्या त्रिशूळाची उपमा दिली आहे. आम्ही तिघे त्रिशूळ म्हणून काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच सामान्य जनतेचा छळ करणाऱ्यांच्या विनाशासाठी आम्ही शंकराचा तिसरा डोळा बनू असेही फडणवीसांनी म्हटले.
अजित पवारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी : या कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांची प्रशासनावरील पकड किती मजबूत आहे याची झलक दाखवली. त्यांनी गडचिरोलीतील अधिकाऱ्यांना तेथे राहून जनतेचे काम करण्याची तंबी दिली. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्री गडचिरोलीत येतात, तेव्हा मंत्रालयातील सचिवांनी देखील इथे यायला हवं. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये पोस्टिंग असताना नागपूर सारख्या शहरात राहून नोकरी करू नये, अशी तंबी त्यांनी दिली.
हेही वाचा :