गडचिरोली - नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या विलय सप्ताहाला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. दुर्गम भागामध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने लावलेल्या नक्षली बॅनरची नागरिकांनी होळी करून नक्षलवादी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पेंढरी ते ढोरगट्टाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला नक्षलवाद्यांनी लोकांच्या मनात दहशतनिर्माण करण्याच्या उद्देशाने, वाहतुकीस अडथळा व्हावा यासाठी, नक्षल विलय सप्ताह पाळण्याबाबत मजकूर असलेले लाल कापडी बॅनर लावले होते. पेंढरी हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन नक्षल विलय सप्ताहास विरोध करत नक्षल्यानी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली. यावेळी नागरिकांच्या नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
नक्षलवादी निष्पाप आदिवासी नागरिकांचा निर्घृण खून करतात आणि अश्या प्रकारे बॅनरबाजी करून सामान्य जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सामान्य आदिवासी जनतेने नक्षलवाद्यांना चांगल्या प्रकारे ओळखले असून यामुळेच आम्ही नक्षलवाद्यांचा विरोध करत असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.