गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शुक्रवारी राष्ट्रीय बाल हक्क आयोग व राज्य बाल हक्क आयोगाची जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत विदर्भातील सहा जिल्ह्यातील 142 प्रत्यक्ष तक्रारींवर सुनावणी करत, त्यांचे निवारण करण्यात आले.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सदस्य दोन दिवसांपासून गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या सदस्यांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन बालकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी सभागृहात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांसाठी शुक्रवारी जनसुनावणी घेण्यात आली.
या जनसुनावणीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. जी. आनंद यांच्यासह राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सदस्या वासंती देशपांडे, सीमा व्यास उपस्थित होते. यावेळी बोलताना बाल हक्क व संरक्षणाबाबत स्थापन झालेल्या आयोगाला लोकाभिमुख करायचे आहे असे, मत राष्ट्रीय बाल आयोगाचे सदस्य डॉ. आर. जी. आनंद यांनी व्यक्त केले.
हा भारतातील 9 वा तर महाराष्ट्रातील पहिलातच असा बेंच आहे, जिथे प्रत्यक्ष जिल्ह्यात जाऊन बाल हक्कांबाबत सुनावणी घेतली जात आहे. आम्ही अशा प्रकारे प्रत्यक्ष जाऊन विविध तक्रारी मार्गी लावण्यासाठी व सामान्य लोकांच्यात आयोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी फिरत आहोत, असेही आनंद यांनी सांगितले.