गडचिरोली - मुख्यमंत्री मुंबईचे तर उपमुख्यमंत्री पुण्याचे असल्याने विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी ते बुधवारी गडचिरोलीत आले होते.
नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणे, आपत्ती निधीत दुजाभाव यावरून हे स्पष्ट झाले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विदर्भातील जिल्ह्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी देखील ठाकरे सरकारने रोखला आहे, अशी घणाघाती टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे.
अजुनही मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा नाही
पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत आले होते. त्यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा अजुनही झाला नाही. विशेष म्हणजे असे पहिल्यांदा होत आहे. नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणे, आपत्ती निधीत विदर्भावर दुजाभाव यावरून मुंबई, पुण्याची मंडळी विदर्भावर अन्याय करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत
महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती होत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी केलेली ठोस कामे अद्यापही दिसत नाहीत. त्यामुळे हे सरकार निष्क्रिय असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीनंतर घोषित केलेली नुकसानभरपाई अद्यापही नागरिकांना मिळाली नाही. विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव सरकारने केले ते पाहता सरकारमध्ये समन्वय नाही. केवळ कामांना स्थगिती देणे इतकीच कामे या सरकारच्या काळात सुरू आहे. त्यामुळे अपेक्षाभंग झालेली जनता पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहोत, हे अनैसर्गिक सरकार जास्त वेळ चालणार नाही, हे सरकार जेव्हा ते पडेल तेव्हा आम्ही सक्षम सरकार देऊ, असे फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचा - पर्यायी सरकार देण्यास आम्ही सक्षम - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - 'आमदार, कार्यकर्त्यांची चलबिचल होऊ नये, म्हणून 'असे' गाजर दाखवावे लागते'