गडचिरोली - जिल्ह्यातील पूरस्थितीनंतरची पाहणी करताना केंद्रीय पथकाने दुसऱ्या दिवशीही काही गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पथकातील सदस्य संचालक, केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकारी आर.पी.सिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीक निवड करत असताना जमिनीचा प्रकार पाहवा, असा सल्ला दिला. वातावरण व जमिनीचा प्रकार हा कोणत्याही पिकासाठी महत्त्वाचा असतो. धान पिकाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यात करडई, हरभरा तसेच वाटाणा अशा पिकांची निवडही करता येईल असे ते म्हणाले.
वेगवेगळ्या तीन पथकाकडून पाहणी -
दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात वेगवेगळया तीन पथकांनी कनेरी, पारडी, वसा, पोर्ला, लाडज या पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली. कनेरी, पारडी व वसा या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून, झालेल्या नुकसानाबाबतची चर्चा पथकातील सदस्यांनी केली. भेटी दिलेल्या पथकात आर.पी.सिंग, संचालक कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे बरोबर अधीक्षक अभियंता केंद्रीय कार्यालय नागपूरचे महेंन्द्र सहारे तर इतर पथकात रमेश कुमार गंटा, आर.बी.कौल यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांशी साधला संवाद-
कनेरी या गावात गजानन पाणनकर या शेतकऱ्याशी पथकाने संवाद साधला. त्यांच्या शेतात कपास पिकाचे नुकसान झाले होते. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून त्या शेताची पाहणीही पथकाने केली. तसेच पारडी या गावातील शोभा बोकडे या शेतकऱ्याच्या पूरबाधित क्षेत्राचीही पाहणी केली. गोगाव येथील रस्त्यालगत असलेल्या शेतामधील पूरपरिस्थितीनंतर नव्याने लागण केलेल्या करडई या पिकाची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेवटी वसा येथील कुमरे यांच्या शेतीमधील धान कापणीनंतरची परिस्थिती प्रत्यक्ष शेतात जाऊन केली गेली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची परिस्थिती पथकातील सदस्यांना सांगितली.
गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट -
संचालक कृषी मंत्रालय अधिकारी आर.पी.सिंग यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, गडचिरोली या ठिकाणी भेट देवून धान खरेदी प्रक्रिया पाहिली. यावेळी पूरबाधित क्षेत्रातून आलेल्या धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवादही साधला. धान खरेदी केंद्रावरील प्रक्रिया जाणून घेत असताना धानाची गुणवत्ता व शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत पथकातील सदस्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे व कुमरे यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. या पथकाबरोबर तहसिलदार महेंद्र गणवीर, नेहरु युवा केंद्राचे संदिप कराळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी उपस्थिती होते. यानंतर केंद्रीय पथके ब्रम्हपूरीकडे रवाना झाली.