चंद्रपूर - राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात दारू तस्कर आणि गुन्हेगारीवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. गोंडपिपरी नगराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही लावण्यात आलेला असून, यातून तस्करांचे मुसक्या आवळण्यासोबतच गुन्हेगारांच्या संशयित कारभारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
गोंडपिपरी तालुका तसा शांतप्रिय म्हणून ओळखला जातो. तालुक्याला तेलंगणा आणि गडचिरोली जिल्ह्याची सिमा लागून आहे. चंद्रपुरात दारूबंदी झाल्यानंतर तेलंगणातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी व्हायची. हल्ली लॉकडाऊन आणि पोडसा पुलाचा भाग तुटल्याने याचा बरासचा परिणाम तस्करीवर झाला आहे. मात्र, दारूतस्कर संधी साधून आपले काम फत्ते करीत आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने चोरबिटी तस्करही सरसावले आहेत. महसूल विभागाला हाताशी घेत अवैध रेती तस्करांनी सपाटा लावला आहे.
नगरातील संशयास्पद हालचाली टिपण्यासोबतच विविध वाईट कामांवर हालचाली टिपण्यासाठी पोलीस निधीतून गोंडपिपरीत सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तहसील कार्यालयासमोरील भाग, धाबा पाईंट, गणेशपिपरी धाबा मार्गावर आस्वले यांच्या घराजवळ, गांधी चौक, शिवाजी चौक आणि व्यंकटपूर मार्गावरील संविधान चौकात हे सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती ठाणेदार संदीप धोबे यांनी दिली.
खनीज संपत्तीने संपन्न असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांचा सुळसुळाट आहे. प्रशासनाकडून अनेकदा कारवाई होऊन देखील न जुमानता मध्यरात्रीचा फायदा घेत अवैध रेती तस्करीचा कारभार केला जातो. अशावेळी या रेती तस्करांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाकडून गोंडपिपरी तालूका महसूल विभागाकडे कॅमेरे आले असून, लवकरच तेही शहरातील विविध भागात लावण्यात येणार आहेत.
सध्या शहरात काही व्यावसायिक लपून छपून धंदे करत आहेत. त्यामुळे आमच्या पोलिस प्रशासनाला त्यांना पकडण्यासाठी दमछाक करावी लागत होती. आता शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, ते कॅमेऱ्यात कैद झाले तर आम्हाला सीसीटीव्हीची मदत लागणार असल्याचे ठाणेदार संदीप धोबे यांनी सांगितले.