गडचिरोली - मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्फे हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रात एकरी केवळ 9.60 क्विंटल धान खरेदीची मर्यादा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासाठी आज धोनोरा येथे आमदार देवराव होळी यांच्या नेतृत्वात भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारक, वनपट्टेधारक शेतकऱ्यांचेही धान खरेदी करण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा - ग्रामपंचायती 362 अन् उमेदवारांची संख्या तीन हजार; शंभराहून अधिक बिनविरोध
हाती आलेले धान आदिवासी विकास महामंडळ आणि बाजार समित्यांमध्ये नेले असता तेथे खरेदी बंद आहे. हाच मुद्दा घेत भाजपने धानोरा तालुक्यात आंदोलन केले. वनपट्टेधारक धान उत्पादक शेतकरी व पंजीकृत शेतकरी यांचे धान तातडीने घेण्याची मागणी भाजपने केली. शेतीचा धान हंगाम संपून दोन महिने झाले आहेत. मात्र, अजून धान खरेदीला चालना मिळालेली नाही. भाजपने या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.
धान विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
सद्यस्थितीत मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्फे धान खरेदी केली जात असली, तरी टोकन देऊन शेतकऱ्यांना बोलावले जात असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येतात. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा जमा करून त्यांना मोबाईलवर संदेश पाठवून धान खरेदीसाठी बोलावले जात आहे. यामध्ये शेतकऱ्याचा नंबर लागण्यास बराच उशीर लागत असल्याने अनेक शेतकरी त्रस्त आहेत. काहींनी नंबर लागण्याची प्रतिक्षा सोडून आपले धान्य खाजगी व्यापाराला विकले आहे.
हेही वाचा - राज्यात सर्वाधिक वनक्षेत गडचिरोलीत असूनही प्रकल्प व पर्यायी वनीकरण नाही