गडचिरोली- पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्यांदा भामरागड गावातील दोनशे घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस व विविध धरणांतून पाणी सोडल्याने जिल्ह्यातील ९ हून अधिक अधिक मार्ग बंद झाले आहेत. भामरागड गावात पुराचे पाणी शिरण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने त्या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळी ११ वाजता गोसी खुर्द धरणाचे ३३ पैकी २९ दरवाजे १ मीटरने तर ४ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून ६७७६ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. छत्तीसगडवरुन वाहणाऱ्या इंद्रावती, तसेच तेलंगणातून येणाऱ्या गोदावरी, प्राणहिता नद्यांना पूर आल्याने दक्षिण गडचिरोलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुरामुळे आलापल्ली-भामरागड, असरअली-सोमनपल्ली, हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड-कवंडे, रोमपल्ली-झिंगानूर, पुराडा-धानोरा, कुरखेडा-वैरागड, कुरखेडा-पुराडा, वैरागड-रांगी, तसेच अनेक छोटे मार्ग बंद झाले आहेत. आताही पावसाचा जोर कायम असून धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीलाही पूर येऊन आणखी काही मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.