गडचिरोली - सतत चार दिवस पावसाने झोडपल्यानंतर एक दिवसाची पावसाने उसंत घेतली. मात्र, पुन्हा पावसाने जोर धरल्याने भामरागड-आलापल्लीत मार्गावरील, कुडकेली, कुमरगुडा नाल्याला पूर आला आहे. यासह पर्लकोटा नदीला ही पूर आल आहे. त्यामुळे दोन दिवसात भामरागड तालुक्याचा संपर्क दुसऱ्यांदा तुटला आहे. 26 ते 29 जुलैला चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तीन दिवस तुटलेला होता.
भामरागडलगत पर्लकोटा नदी आहे. या नदीवर अतिशय ठेंगणा पूल असल्याने पूर आल्यावर भामरागडचा संपर्क दरवर्षीच तुटतो. या नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांना दरवर्षी पावसाळ्यात संपर्का बाहेर राहावे लागते. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तीन दिवस तुटला होता. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भ्रमणध्वनी सेवा व वीज सेवा बंद होती. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
तीन दिवसानंतर मार्ग सुरू झाला. मात्र, परत एकदा पर्लकोटा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीला पूर आला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावरील दोन नाल्यांना ही पूर आल्याने हेमलकसा मार्ग बंद झाला आहे. हेमलकसा-भामरागड हा मार्गही काही वेळातच बंद होण्याची शक्यता दिसून येत आहे. चार दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर एक दिवस पावसाने उसंत घेतली खरी पण पुन्हा पावसाने जोर पकडला असून दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीही धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.