गडचिरोली - मी अहेरीसारख्या दुर्गम भागामध्ये संपर्क साधू शकलो नाही. मात्र, विकासकामे केली आहेत. तसेच येथून पुढे देखील कामे करणार आहे. त्यामुळे विरोधकांप्रमाणे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करून मत मागण्याची गरज नसल्याची टीका अहेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजे अंबरीश आत्राम यांनी केली. ते ताडगाव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान बोलत होते.
आत्राम यांचा १३ ऑक्टोबरला भामरागड तालुक्याच्या धोडराज, आरवाडा, हेमलकसा आणि आलापल्ली आदी गावांमध्ये दौरा होता. यावेळी त्यांना जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आपला भाग हा अतिशय दुर्गम आहे. हाच दुवा ठेऊन मी केलेल्या विकास कामांमुळे तुमच्या समस्या काही प्रमाणात सुटल्या आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी जास्त संपर्क साधू शकलो नाही. यासाठी आपली मनापासून माफी मागतो. आपल्या भागात नळ योजना, पर्लकोटा नदीवरील पूल अशा अनेक मुलभूत समस्या मी पुढाकार घेऊन सोडविल्या आहेत. यावेळी झालेल्या काही चुका सुधारून अधिक जोमाने काम करील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.