गडचिरोली - जिल्ह्यात पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे भात पिकाचे पर्हे करपण्याच्या मार्गावर होते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना अखेर गुरुवार व शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, सध्या मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती. अनेकांचे भाताचे पर्हे तीव्र उन्हामुळे करपायला लागले होते. त्यामुळे मिळेल त्या साधनांद्वारे पाणी देऊन पिक वाचवण्याची धडपड शेतकऱ्यांकडून सुरू होती. काही शेतकऱ्यांनी तर दुबार पेरणी केली. आकाशात ढग दाटून येत होते. मात्र, पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतातूर होते. अखेर पावसाची प्रतीक्षा गुरुवारी संपली.
वरुणराजाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. पाऊस पडण्यासाठी दोन महिने निघून गेले असले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 800 हेक्टरवर रोवणी तर 28 हजार 331 हेक्टरवर आवत्या पेरणी झाली आहे. मात्र, आता जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने रोवणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. गुरुवारी व शुक्रवारी पडलेला पाऊस पुढेही कायम राहावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.