गडचिरोली - कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी अनोख्या उपक्रमातून सोशल डिस्टन्सिंग राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन व्हिडिओ कॉलद्वारे नागिकांशी संवाद साधत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही सुविधा सुरू झाली आहे.
कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले. तरीही नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येवून चौकशी करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.
जर एखादा व्यक्ती ई-पासबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करीता आला. तर त्याला त्याचठिकाणी ई-पास बाबत प्रत्यक्ष ऑनलाईन तपशील पाहून माहिती सांगितली जाते. जर त्याचे समाधान झाले नाही, तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना पहिला व्हिडिओ कॉल केला जातो. याही ठिकाणी समाधान न झाल्यास निवासी उपजिल्हाधिकारी मार्गदर्शन करतात. यानंतर स्वत: जिल्हाधिकारी आवश्यकतेनूसार तिसऱ्या टप्प्यात नागरिकांशी संवाद साधतात.
या सुविधेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, किशोर मडावी, संजय बारसिंगे, विक्की कण्णके काम पाहत आहेत. सध्या कोरोना लढयात मोठया प्रमाणात शासकीय यंत्रणा प्रत्यक्ष काम करत आहे. या संसर्गापासून यंत्रणेला दूर ठेवून नागरिकांना आवश्यक सेवा अखंड स्वरूपात उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे.
आपण जेवढे सामाजिक अंतर पाळू तेवढ्या प्रमाणात आपण कोरोना संसर्गाला रोखण्यात यशस्वी होवू. प्रशासनाकडे दूरध्वनीवर किंवा ईमेलवर संपर्क साधून नागरिकांनी जास्तीत-जास्त सामाजिक अंतर राखावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अशाप्रकारे आवश्यक काळजी घेणे आता गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.