गडचिरोली - नक्षल चळवळीत होणारी पिळवणूक आणि पोलीस खात्याची बदललेली रणनिती पाहता गडचिरोली पोलिसांसमोर कसनसूर दलमच्या 6 जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी आत्मसमर्पण केले. यामध्ये ५ महिला नक्षली आहेत. या ६ जणांवर जाळपोळ, चकमक, अपहरण, खून असे विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 31 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये संदिप उर्फ महारू चमरू बढे (३०) हा जहाल माओवादी आहे. तो फेब्रुवारी २००९ मध्ये कसनसूर दलमच्या सदस्य पदावर भरती होऊन एप्रिल २०११ पासून आजपर्यंत कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १७ गुन्हे, खुनाचे ४, जाळपोळीचे ७, अपहरणाचे २ गुन्हे दाखल असून शासनाने त्याच्यावर ६ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण करणाऱ्या महिलांमध्ये मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरवामी (३०) ही माओवादी आहे. ती डिसेंबर २००३ मध्ये टिपागड दलममध्ये सद्स्य म्हणून भरती झाली होती. त्यानंतर २००४ पासून आजपर्यंत कसनसूर दलमच्या सदस्यपदी ती कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ९, खुनाचा १ व जाळपोळीचे २ गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ५ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दुसऱ्या महिलेचे नाव स्वरुपा उर्फ संथिला उर्फ सरीता सुकलु आतला (२३) ही माओवादी ऑगस्ट २०१४ मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती झाली होती. ती जून २०१६ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत टिपागड दलममध्ये कार्यरत होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ ते आजपर्यंत ती प्लाटुन क्र. ३ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ६ गुन्हे व खुनाचे ४ गुन्हे दाखल असून शासनाने तिच्यावर ५ लांखाचे बक्षीस जाहीर केले होते. अनी उर्फ मिला मोतीराम तुलावी (२५) ही माओवादी एप्रिल २००८ ला गट्टा दलमच्या सदस्य पदावर भरती होवून सन २०१४ पर्यंत कार्यरत होती. त्यानंतर २०१४ ते २०१९ पर्यंत ती कंपनी क्र. ४ च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावरही चकमकीचे १४, खुनाचे ५ व जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल आहेत. तर, शासनाने तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ममिता उर्फ ममता जन्ना राजु पल्लो (२०) ही सन २०१६ मध्ये चामोर्शी दलममध्ये भरती होवून फेब्रुवारी २०१७ नंतर कंपनी क्र. ४ च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ३ तर जाळपोळीचा १ गुन्हा दाखल आहे. शासनाने तिच्यावर ५ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तुलसी उर्फ मासे सन्तु कोरामी (२४) ही २०१० मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. त्यानंतर मार्च २०१० ते आजपर्यंत ती कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर ६ चकमकीचे गुन्हे दाखल असून शासनाने ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
हेही वाचा - सौर ऊर्जेवरील दुहेरी नळयोजनेमुळे मेडपल्ली, हेमलकसामध्ये दिवसभर पाणीपुरवठा
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ मध्ये आजपर्यंत एकूण २९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ३ डिव्हीसी, २ दलम कमांडर, १ दलम उपकमांडर, २२ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर, २१ माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये डीकेएसझेडसी मेंबर २, दलम कमांडर १, सदस्य ३, पार्टी मेंबर २, समर्थक १३ यांचा समावेश आहे. तर, २००५ ते आजपर्यंत एकूण ६३३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया उपस्थित होते.
हेही वाचा - धक्कादायक! धान कुटताना झाला स्फोट; एक ठार तर दोन जखमी