गडचिरोली- जिल्ह्यात सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल (शुक्रवारी) शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा एक कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आज आढळलेली महिला रूग्ण काल आढळून आलेल्या रुग्णाची पत्नी असल्याने ती गृह विलगीकरणात होती.
4 जूनला शहरातील गांधी वॉर्डातील एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. हा रुग्ण मुंबई येथून गडचिरोलीला आला होता. तेव्हापासून तो संस्थात्मक विलगीकरणात होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज त्याच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती गर्भवती असल्याने तिला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता शहरात एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गांधीवॉर्ड व वंजारी मोहल्ल्याचा काही भाग सील करण्यात आला आहे.
गांधी वॉर्डातील पूर्वेकडील नसरुद्दिन नाथानी यांच्या घरापासून पश्चिमेकडील मधुकर नंदनवार यांच्या दुकानापर्यंतचा मार्ग, तसेच दक्षिणेस विशाल कलेक्शन व फ्रेंड्स बॅग हाऊसच्या मागील घरापर्यंतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.