धुळे - शहरातील पांझरा नदीमध्ये पोहत असताना एक 23 वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी या तरुणाचा शोध घेत आहेत. अक्षय सोनवणे असे त्या युवकाचे नाव आहे.
अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आल्याने सध्या पांझरा नदीला पूर आला आहे. यातच सोमवारी धुळे शहरात कानूमातेचा विसर्जन सोहळा पार पडला. या विसर्जनावेळी शहरातील फुलेनगर भागातील ब्रिज कम बंधारा याठिकाणी अक्षय सोनवणे नावाचा 23 वर्षीय तरुण पोहत असताना अक्षय या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अक्षयचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी अक्षयचा शोध घेत असून दुपारपर्यंत अक्षयचा शोध लागलेला नव्हता. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती.