धुळे - लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबादेतून आलेल्या पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या पथनाट्याच्या वाहनाचे उदघाटन करण्यात आले. हे पथक शहरात ठिकठिकाणी जाऊन मतदानाविषयी जनजागृती करणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी औरंगाबाद येथील आभा कलामंचचे कलावंत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. रिजनल आऊटरीच ब्युरो पुणे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणार आहे. या पथनाट्यात मदन निमरोट, युवराज सुतार, योगेश जोशी, के. एस. नवतुरे, शकुंतला ससाणे या कलावंतांचा समावेश आहे. मतदान करणे हा आपला अधिकार आहे. यासाठी प्रत्येकाने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.