धुळे - संचारबंदीमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्यांबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर लाठीच्या प्रसादासह साक्री पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करत वाहनांवर फिरणारांची वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धुळे जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान मास्कचा वापर न करता रस्त्यावर वाहने घेऊन फिरणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांना साक्री पोलिसांनी चोप देत वाहने जप्तीचा दणका दिला आहे. काही टवाळखोर नागरिक वारंवार सूचना देऊन देखील या सुचनाकडे दुर्लक्ष करत चेहऱ्याला मास्क न लावता संचारबंदीत साक्री शहरातील रस्त्यांवर बिनधास्तपणे बाहेर फिरतांना साक्री पोलिसांना आढळल्याने साक्री पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.