धुळे - संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी असताना धुळे शहरात मात्र, प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरु आहे. धुळे शहराजवळील अवधान येथील गोडाऊनवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक व धुळे महानगरपालिकेचे पथक यांच्या एकत्रित प्रयत्नाने आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे प्लॅस्टिक पिशव्या धारकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
धुळे शहराजवळील अवधान येथील रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर एक गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून सुमारे दोन टन प्लॅस्टिक माल धुळे महानगरपालिकेच्या पथकामार्फत जप्त करण्यात आला. येथील मयूर ट्रेडर्स, सुनील ट्रेडर्स आणि कृष्णा प्लॅस्टिक ट्रेडर्स या ठिकाणी असलेल्या गोडाऊनवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक व धुळे महानगरपालिकेचे पथक यांनी एकत्रितपणे आज सर्वात मोठी कारवाई केली. या तिन्ही ठिकाणी एकूण दोन टन प्लॅस्टिक माल जप्त करुन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच तीनही कंपन्यांना प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे 75000/- हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. यानिमित्ताने प्लास्टिक वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आणि आयुक्त गंगाधरण डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्लॅस्टिक वापर टाळण्यासाठी छोट्या विक्रेत्यांपेक्षा मोठया विक्रेत्यांकडे धुळे महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत केले असून याबाबत वारंवार शोधमोहीम व दंड आकारणी करण्याबाबत महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे.