धुळे - शिरपूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून गायब झालेला पाऊस शनिवारी काही प्रमाणात परतला. मात्र, पावसादरम्यान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन्हीही मृत शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील होते. तर त्यांच्याबरोबर असलेले दोन जण हे गंभीर आहेत. त्यांना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
झाडाखाली थांबले अनं..
शिरपूर तालुक्यातील कुरखळी परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. गावातील चार युवक शेतात मजुरीसाठी गेलेले होते. शेतातील काम आटोपून ते घरी परतत होते. यावेळी पाऊस आल्याने ते आसरा घेण्यासाठी झाडाखाली थांबले. पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून निंबाच्या झाडाखाली थांबलेल्या युवकांवर अचानक वीज काेसळली. यात कुरखळी गावातील मनोज सुकलाल कोळी (वय-२५) व सुनिल सुदाम भिल (वय-३०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले रवींद्र गुलाब भिल व समाधान बारकू भिल हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, कारला पिकअपची धडक
गावकऱ्यांची मागणी -
एकाच गावातील दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे कुरखळी गावावर शोककळा पसरली आहे. शासनाने मृत आणि जखमींना योग्य ती मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मागच्या जून महिन्यातही ताजपूरी येथील एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला होता.