धुळे : शहरात ऐंशी फुटी रोड आणि वडजाई रोडच्या चौफुलीवर उभारलेले टिपू सुलतानच्या स्मारकाचे बांधकाम कंत्राटदाराने स्वतः शुक्रवारी पहाटे हटविल्याची माहितीही त्यांनी दिली. हा वाद मिटविण्यासाठी आमदार फारुक शाह यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपचे आंदोलन : स्मारकाच्या बांधकामाची नियमानुसार परवानगी घेतली नसल्याने भाजपसह हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांनी विरोध दर्शविला होता. महापौर प्रतिभा चौधरी यांनी स्मारकाचे बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते. तर भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे आणि प्रदीप पानपाटील यांनी धरणे आंदोलन केले. स्मारक हटविले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. यामुळे धुळे शहरासह जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या स्तरावर बैठकांचे सत्र सुरू होते.
कंत्राटदारानेच काढून टाकले स्मारक : टिपू सुलतान यांचे स्मारक ज्या कंत्राटदाराने बांधले होते, त्यांनी स्वतःच ते काढून घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. या स्मारकाच्या बांधकामाला नियमानुसार परवानगी घेतलेली नव्हती म्हणून विरोध तीव्र झाला होता. टिपू सुलतान स्मारकाचा वाद आणि मोगलाईतील राम मंदिर मूर्तीची शनिवारची रॅली, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आले.
मोर्चा नव्हे मूर्तीची रॅली: मोगलाईतील राम मंदिरात मूर्तीची विटंबना झाल्याने १० जून रोजी भव्य मोर्चाचे आवाहन भाजपसह हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांनी केले आहे; परंतु शहरात जमावबंदीचे आदेश असल्याने मोर्चाला नव्हे तर मूर्तीच्या शोभायात्रेला, रॅली काढायला परवानगी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. मूर्तीची शोभायात्रा शांततेत काढावी, असे आवाहन त्यांनी केले.
१२ तारखेला भव्य एल्गार मोर्चा: नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरवादी पक्ष-संघटनांतर्फे भव्य एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील घटनेचा धुळे जिल्ह्याशी काही एक संबंध नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. साक्री तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितांना अटक झाली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. मोर्चामध्ये या घटना एकत्रित करू नये आणि शांतता राखावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.
प्रतिबंधात्मक आदेश जारी : धुळे शहरासह जिल्ह्यात विविध घटनांमुळे तणावाचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रांत अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धुळे महानगरपालिका हद्दीत १२ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा: