धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणाऱ्या एका ११० वर्षीय वृद्धावर आपली जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी प्रशासनाकडे विनंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी या वृद्धाने केली आहे. पारशी सुरज्या भिल असे या वृद्धाचे नाव आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या उमरदा येथील पारशी सुरज्या भिल या ११० वर्षीय वृद्धाची १४ हेक्टर जमीन त्यांचा भाऊ आरश्या सुरज्या भिल यांनी त्यांना मृत दाखवून आपल्या नावावर करून घेतली. यानंतर आरश्या भिल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी ती जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आहे. पारशी भिल हे आजही जिवंत असताना त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. आपल्याला मृत दाखवून आपली जमीन हडप करणाऱ्या आरश्या भिल यांच्या मुलांवर प्रशासनाने कठोर कारवाई करून आपली जमीन आपल्याला परत मिळावी अशी मागणी पारशी भिल यांनी केली आहे.
पारशी भिल यांचा मुलगा मालसिंग भिल यांनी याबाबत वारंवार तक्रार करून देखील आद्यप ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आपली जमीन आपल्याला परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी समाजात मुलींच्या नावावर संपत्ती केली जात नाही, मात्र तरी देखील आरश्या भिल यांच्या मुलींच्या नावावर ही जमीन करण्यात आली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी पारशी भिल यांच्यावर वयाच्या ११० व्या वर्षी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.