धुळे- अखेर राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आज त्यांच्या स्वगृही सुखरूप वापस आणण्यात आले. त्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आपल्या पालकांसोबत घरी जाताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला. लॉकडाऊन काळात राजस्थानातील कोटामध्ये राज्यातील बहुसंख्य विद्यार्थी अडकले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने स्वगृही परत आणण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जिल्हा परिवहन विभागातर्फे अडकलेल्या विद्यार्थ्यांना वापस आणण्यासाठी ७० बसेस कोटाकडे पाठविण्यात आल्या. बसेसमधून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना आज स्वगृही पोहोचविण्यात आले. त्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.
विद्यार्थ्यांना धुळ्यात परिवहन विभागाच्या परिसरात उतरवण्यात आले व त्यानंतर त्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली. कोटावरून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही कुठलाही शारीरिक त्रास होत नसल्याची चाचपणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातावरती विलगीकरणाचे शिक्के मारण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आधी प्रशासनाकडून पालकांना व विद्यार्थ्यांना काही सूचना करण्यात आल्या, त्यात विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर विलगीकरणात राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. १४ दिवसांच्या विलगीकरणादरम्यान कुठलाही त्रास जाणवल्यास त्यांनी धुळे शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधवा, अशी सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली.
हेही वाचा- पालकमंत्र्यांच्या हस्ते धुळ्यात ध्वजारोहण कार्यक्रम पडला पार