धुळे - मालेगावमधील रुग्ण इतर ठिकाणी इलाजासाठी पाठवण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी मालेगावमधील कोरोनाग्रस्त रुग्ण धुळ्यात आणण्यास तीव्र विरोध केला आहे. मालेगावच्या परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे म्हणत राज्य सरकार केंद्राची मदत घेण्यास तयार नसल्याचा आरोप देखील भामरे यांनी केला आहे.
राज्य सरकारला केंद्राची मदत घेण्यास का कमीपणा वाटतो? असा प्रश्न देखील यावेळी भामरे यांनी विचारला.
मालेगाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. आता मालेगावमध्ये उपचार करणे अशक्य असल्याने मालेगावचे कोरोनाबाधित रुग्ण नाशिकला किंवा धुळ्याला पाठवण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नाही. अशातच नाशिकच्या राजकीय पुढाऱ्यांनी मालेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी आणण्यास विरोध केला आहे. नाशिकमधील विरोधानंतर धुळ्यातील राजकीय पुढाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. यामुळे मालेगावच्या कोरोना रुग्णांच्या उपचारावरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
धुळ्यात मालेगावचे रुग्ण पाठविण्याचा अट्टाहास सुरू असल्यामुळे धुळेकरांमध्ये संतापाची भावना बघावयास मिळत आहे. मालेगावमधील कोरोनाग्रस्त रुग्णांवर तेथेच अत्याधुनिक आवश्यक असलेली यंत्रसामग्री पुरवून इलाज करावा, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.